PM Kisan Scheme : एकीकडे पीएम नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान योजनेचा (PM Kisan 19th Installment) १९ व्या हफ्त्याचे वितरण २४ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. देशातील जवळपास ९ कोटी शेतकऱ्यांना या हफ्त्याचा लाभ मिळणार आहे. आता या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या हफ्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Yojana) हफ्ता देखील मिळणार का? असे प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. PM Kisan Scheme
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. कारण, आता सोमवारी (२४ फेब्रुवारी) या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank DBT Transfer) हस्तांतरित केले जातील. यापूर्वी, १८ वा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जारी केला होता. गेल्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे २० लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. पीएम किसान योजनेच्या हफ्त्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीची देखील प्रतीक्षा आहे.
दरम्यान राज्यातील जवळपास ९१ ते ९२ लाख शेतकरी पीएम किसान सोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. साधारण पीएम किसान योजनेच्या हफ्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हफ्ता जमा केला जातो. मात्र यावेळी असे होणार नसल्याची शक्यता आहे. यापूर्वी पीएम किसानचा १८ वा हफ्ता आणि नमो शेतकरी योजनेचा ५ वा हफ्ता एकत्र देण्यात आला होता. मात्र त्यावेळी गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे यावेळी सुरवातीला केवळ पीएम किसानचा हफ्ता दिला जाणार आहे. PM Kisan Scheme
मग नमोचा हफ्ता कधी?
तर २४ फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. पीएम किसानचा हफ्ता वितरित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाईल. त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा वितरित करतील. यासाठी साधारण सात ते आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच ०१ किंवा ०२ मार्चच्या दरम्यान नमो सन्मान शेतकरी योजेनचा हफ्ता येण्याची शक्यता आहे.