Heavy Rain Bharpai : जुलै ते ऑक्टोबर २०२४ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सरकारने दिलासा दिला आहे. राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी ४५ लाख ८४हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने २८ मार्च रोजी प्रकाशित केला आहे.
राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत करतं. त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील पाच विभागातील २२ जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्य सरकारला विभागीय आयुक्तांकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार कोकण, नागपूर, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीतून बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच १ जानेवारी २०२४च्या शासननिर्णयानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
राज्यातील नाशिक विभागाला सर्वाधिक ३६३ कोटी ६६ लाख २३ हजार रुपयांची निधी मिळणार आहे. त्यापाठोपाठ अमरावती विभागाला ३२४ कोटी ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पुणे विभागासाठी १६ कोटी २ लाख ४ हजार, नागपूर विभागासाठी २४ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर जिल्हानिहाय बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ३०० कोटी ३५ लाख रुपये, नाशिक जिल्ह्यात १९३ कोटी ७ लाख ८ रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक १४४ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये, अकोला जिल्ह्यासाठी २२ कोटी ७३ लाख तर वर्धा जिल्ह्यासाठी ११ कोटी ७६ लाख, पालघर जिल्ह्यासतही ९ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच धुळे जिल्ह्यासाठी ९ कोटी १९ लाख ३६ हजार रुपये, नागपूरसाठी १० कोटी आण, गडचिरोलीसाठी २ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपये, यवतमाळसाठी ४८ लाख रुपये, सांगली जिल्ह्यात ८ कोटी ५ लाख रुपये, पुणे जिल्ह्यासाठी २ कोटी ६० लाख रुपये तर ठाणे ३ लाख २ हजार, रायगड ३ लाख २५ हजार रुपये रत्नागिरी १ लाख २१ हजार आणि सिंधुदुर्ग ५ लाख २ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.