नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?

नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी या हेतूनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना पाच हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षात शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. म्हणजेच सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात 12 हजार रुपये मिळतात. नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांची वाढ करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होतं. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 15000 रुपये दरवर्षी मिळतील. 

नमो शेतकरीचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले?

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला. या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार  महाराष्ट्र  राज्य शासन सन 2023-24 पासून ही योजना राबवत आहे. या योजनेद्वारे पीएम किसान योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष  6000 रुपये वार्षिक अनुदान तीन समान हप्त्यात थेट लाभहस्तांतरणाद्वारे दिले जाते. या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9055.83 कोटी रक्कम जमा करण्यात आली. नमो शेतकरीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ग करण्यात आला होता.

नमो शेतकरी महासन्मानच्या निधीत वाढ होणार?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं आज उपमुख्यमंत्री अजित पवार जो अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वाढवून मिळणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन सन 2018-19 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) राबवित आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण  6000 रुपये वार्षिक अनुदान तीन समान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते. योजना सुरू झाल्यापासून माहे ऑक्टोबर, 2024 पर्यंत राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ₹ 33468.55 कोटी रक्कम जमा करण्यात आली. महाराष्ट्रातील जे शेतकरी पहिल्या पासून पीएम किसानचे लाभार्थी असतील त्यांना 19 हप्त्यांचे 38000 रुपये मिळाले आहेत. 

Leave a comment